संवर्धन केलेल्या वटवृक्षांचा पार पडला नामकरण सोहळा
बालाजी फाउंडेशनचा उपक्रम; वटवृक्षांना दिली जिल्ह्यातील क्रांतिकारक, हुतात्मे व शहीद सैनिकांची नावे
अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन ते चार वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षांचे संवर्धन करुन बालाजी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त लावलेल्या झाडांचा नामकरण सोहळा पार पडला. बालाजी देडगाव वडराई (ता. नेवासा) येथे लावण्यात आलेल्या झाडांना स्वातंत्र्य संग्रामातील जिह्यातील क्रांतिकारक, हुतात्मे व देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची नावे देण्यात आली.
समाजात एक प्रेरणादायी संदेश देण्याच्या उद्देशाने व क्रांतिकारकांच्या बलिदानाला उजाळा देण्याच्या उद्देशाने हा आगळा-वेगळा उपक्रम बालाजी फाउंडेशनने राबविला. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, सचिव शिवाजी उबाळे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत पाटील शेळके आदींसह स्थानिक ग्रामस्थ व वृक्ष प्रेमी सहभागी झाले होते .
मेजर शिवाजी पठाडे म्हणाले की, पर्यावरण दिवस हा एक निसर्गाबद्दल जागृतीचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. पुढील पिढी स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित पर्यावरणात जगावी यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. प्रत्येकाने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धनाने निसर्ग रक्षणासाठी हातभार लावावा. पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
बालाजी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने व लोकसहभागातून वडराईतील ओसाड माळरानावर वटवृक्ष फुलविण्यात आले आहे. या झाडांना जिल्ह्यातील शहीद सैनिकांची व क्रांतीकारकांची नावे देण्यात आली असून, यामुळे या झाडांकडे बघण्याचा दृष्टीकोनाने वेगळा राहणार आहे. तर झाडे देखील कोणी तोडणार नाही. या नावामुळे झाडाला एक विशेष ओळख प्राप्त होऊन नवीन पुढीला क्रांतिकारक, हुतात्मे व देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांचा इतिहास ज्ञात होणार आहे. वटवृक्षांना दिर्घायुष्य असल्याने हा ऐतिहासिक वारसा जपला जाऊन पर्यावरणाचे देखील संवर्धन होणार असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.