संविधान विचार मंचच्या वतीने दिलीप गुंजाळ यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान
निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल
सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे -दिलीप गुंजाळ
अहमदनगर (प्रतिनिधी) – रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसनासाठी मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य करणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ संविधान विचार मंचच्या वतीने समर्पित भावनेने आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील भिमतेज आणि शिवतेज मित्र मंडळाच्या माध्यमातून नाशिकचे उद्योजक मोहनभाऊ अडागळे यांच्या हस्ते गुंजाळ यांना गौरविण्यात आले. यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरू आणि प्रमुख धमाल प्रॉडक्शन्सचे सर्व कलाकार उपस्थित होते.
समजात लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. इतर आजार जसे होतात, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात. याला समाज जबाबदार नाही, तर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा दृष्टिकोन कारणीभूत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे असल्याचे मत दिलीप गुंजाळ यांनी पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यक्त केले.
समाजाने नाकारलेल्या या निराधार पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा मानवसेवा प्रकल्प कार्य करीत असून, अनेक मनोरुग्णांना चांगले करुन त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली माणसं उचलून मानवसेवा पुनर्वसन केंद्रात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलतं करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचं, या पध्दतीने मानवसेवा प्रकल्पात निस्वार्थपणे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन गुंजाळ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
- Advertisement -