संशयित कोरोना रुग्णांवर परस्पर उपचार केल्यास कारवाई – आयुक्त शंकर गोरे

0
101

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर महानगरपालिक आरोग्य यंत्रणेला माहिती न देता संशयित कोरोना रुग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या व लक्षणे असतानाही रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणाऱ्या खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अहमदनगर महानगरपालिका आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन उत्परीवर्तनात सर्दी,खोकला,ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने अनेक रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्या ऐवजी खाजगी डॉक्टरांकडून औषधे घेऊन उपचार करीत आहेत.परंतु यातील संभाव्य कोरोना रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य व शेजारील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे असे उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने खाजगी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यास तसेच छोटे नर्सिंग होम चालक मालक यांनाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून कोरोना बाधित रुग्णांवर कोणते उपचार करावेत,अशा रुग्णांसाठी कार्यपद्धती काय असावी या बाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कोरोना संदर्भातील चाचणी केल्या नंतर संबंधित रुग्णांची माहिती महापालिकेस उपलब्ध होऊ शकणार आहे अशी माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. श्री.सतीश राजूरकर यांनी दिली.

तरी खाजगी डॉक्टरांनी कोरोना चाचणी टाळून,लक्षणे असलेल्या एखाद्या रुग्णावर उपचार केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here