समाजासाठी काम करणाराला संपत्तीचा मोह नसतो – नीलेश लंके
नगर : प्रतिनिधी
समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजसाठी काम करणे हेच माझे उद्दीष्ट असल्याचे सांगत आ. नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या कमी झालेल्या संपत्तीबददल तसेच वाढलेल्या कर्जाबाबत पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.
आ. लंके यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आलेल्या त्यांच्या संपत्तीच्या विवरणात त्यांची संपत्ती कमी होऊन त्यांचे कर्जही वाढले असल्याची बाब पुढे आली. त्याबाबत पत्रकारांनी लंके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
एकीकडे तुमची संपत्ती कमी होत असताना विरोधी उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या संपत्तीमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लंके म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की मी जे आजवर काही केले ते समाजसाठी केले आहे. स्वतःसाठी काहीच केले नाही. माइ-यावर आरोप झाले मात्र मी निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर खरे सत्य बाहेर आले. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला संपत्तीचा कधीही मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजासाठी काम करणे हेच माझे उद्दीष्ट आहे. जनतेच्या सेवकाने प्रामणिकपणे काम केले पाहिजे या भावनेतून मी काम करतो.
गेल्या पन्नास वर्षांपासून आम्ही राजकारणात आहोत. आमच्या संस्था आहेत, सहकारामध्ये आम्ही काम करतो त्यामुळे माझी श्रीमंती हा निवडणूकीचा विषय होऊ शकत नाही असे डॉ. सुजय विखे सांगतात या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, त्यांची श्रीमंती सर्वांनाच माहीती आहे. मात्र ही निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी झालेली आहे. सत्तेचा गैरवापर करणे, कार्यकर्त्यांवर दबाव आणणे असे प्रकार विखे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप लंके यांनी केला.
गेल्या साडेचार वर्षात तुमच्या संपत्तीमध्ये घट झाली असून कर्जही वाढले असल्याबद्दल विचारले असता लंके म्हणाले, समाजासाठी काम करत असताना कर्ज वाढणारच आहे. इतरांप्रमाणे आमचे इन्कमींग सुरू नाही.
तुम्ही एक सामान्य उमेदवार असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नगरमध्ये येऊन तुमच्यावर टीका करतात त्याकडे कसे पाहता असे विचारले असता लंके म्हणाले, ते त्यांच्या राजकीय व्यासपीठावर येतात. त्यामुळे त्यांना टीका करणे क्रमप्राप्त असते असे लंके यांनी स्पष्ट केले.
तुमच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत याची आठवण करून दिली असता लंके यांनी कशाचे गुन्हे आहेत हे तपासले का असा प्रतिप्रश्न केला. कांदा भावासाठी मी सरकारमध्ये सहभागी असतानाही आंदोलन केले होते. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मी विचार केला नाही मी सत्तेत आहे की नाही. सगळयात महत्वाचा प्रश्न माझा शेतकरी जगला पाहिजे असे लंके म्हणाले.
▪️चौकट
ढोंगी प्रेम कशासाठी ?
डॉ. सुजय विखे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेनंतर गोपीनाथ मुंडे यांचे फोटो फिरविण्यात आले या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, असे ढोंगी प्रेम कशाला दाखवता ? कार्यक्रम संपल्यावर मुंंडे साहेबांचा फोटो लावणे हा ढोंगीपणा आहे. याआगोदर कधी मुंडे साहेबांचे नाव घेतले का ? बॅनरवर फोटो लावला का ? तुमचे मुंडे साहेबांवर प्रेम होते तर मग पाच वर्षात तुमच्या बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो हवा होता ना ? बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, आर.आर .पाटील, विलासराव देशमुख हे नेते होउन गेले. त्यांच्याविषयी मला नेहमीच आकर्षण राहिलेे आहे असल्याचे लंके यांनी सांगितले.
▪️चौकट
दादागिरी,गुंडगिरीविरोधात निवडणूक
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. आज विरोकांकडून दादागिरीचे वातावरण निर्माण केेले जात आहे. या दादागिरी, गुंडगिरीविरोधात आपण निवडणूक लढवित आहोत. मतदारसंघात पाणी, बेरोजगारी आदी प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे लंके म्हणाले.
- Advertisement -