राज्यातील लम्पी उपाय योजनांचा मंत्र्यांकडून आढावा
नगर प्रतिनिधी – राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा झाले असून, उर्वरित येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री विखे पाटील यांनी राज्यातील लम्पी चर्मरोगा विषयी दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दुरदृष्य प्रणालीव्दारे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी,टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, राज्यात एकूण १ कोटी ४१ लाख गोवर्गीय पशुधन आहे.आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे गोट पाॅक्स लसीकरण झाले आहे. (१.०२ कोटी) उर्वरीत लसीकरण एक आठवड्यात पूर्ण करणेसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
राज्यात मार्च २०२३ ते २० आँगस्ट २०२३ पर्यंत एकूण ३२ हजार ७० पशुधन लंम्पी बाधित आहे.त्यापैकी २० हजार ८९८ बरे झाले असून सक्रिय रुग्ण ८हजार ६२३ ,मृत पशुधन २ हजार ७७५ सक्रिय पशुरुग्ण असणारे जिल्हे २५,सन २०२३-२४ मध्ये १.४१ कोटी लस उपलब्ध असल्याचे त्यांनी बैठकी दरम्यान सांगितले.
मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, ग्रामपंचायत व नगर पंचायत यांचे कडील यंत्रणेच्या मदतीने बाह्यकिटक नियंत्रणासाठी (Vector Control) उपाययोजना तातडीने व नियमितपणे राबविण्याच्या आवश्यकता आहे.यासाठी परिसरामध्ये वेळोवेळी फवारणी व स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने सदर रोगाबाबत पशुपालकामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक असून, ज्यामध्ये रोगाची माहिती त्वरित देणे, बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यांची व परिसराची स्वच्छता इत्यादी बाबत पशुपालकांना ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती देण्याबाबत गांभीर्याने निर्णय करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
सदर रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करणेसाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाय योजना व मृत पशुधनाची विल्हेवाट ईत्यादीबाबत काटेकोर पालन करतानाच,सन २०२३-२४ मध्ये सदर आजाराने मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना नुकसान भरपाई देणेबाबत जिल्हास्तरीय समिती कडून पात्र प्रस्तावाना मान्यता देणेबाबतची कार्यवाही तात्काळ करावी.
आंतरराज्य आंतरजिल्हा बाधित जनावरांच्या वाहतूकीच्या अनुषंगाने या गोवीय पशुंचे २८ दिवसापूर्वी लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनाच्या वाहतूकीस प्रतिबंध करण्यासंबंधीचे तसेच आवश्यकतेनुसार बाजार भरविण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
—–०—–