सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे यावे – अनिता काळे
विविध पुरस्काराने महिलांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी समाजकार्यात पुढे आले पाहिजे. महिला एकजूट झाल्यास सक्षमीकरणाची नांदी ठरणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून, महिलांनी राजकारण व समाजकारणात येऊन बदल घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिता काळे यांनी केले.
सृष्टी सेवाभावी संस्थेच्या वतीने पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाबाई आंबेडकर, माई सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात काळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय फिल्म सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. स्मिता बारवकर, डॉ. भावना शेवनकर, संगीता गुरव, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई गडाख, रेश्मा जगताप, अनुराधा सरवदे आदी महिला उपस्थित होत्या.
पुढे काळे म्हणाल्या की, महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून, स्वयंपूर्ण व्हायला हवे. महिला मुळातच सक्षम असतात. कोणतेही आव्हानात्मक काम तिने मनावर घेतल्यास ते सहजपणे करू शकतात. महिलांच्या यशस्वी होण्याच्या वाटचालीत पुरुषांचाही हातभार आहे. महिलांनी आवडीच्या क्षेत्रात कार्य करुन आर्थिक सक्षम होण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी निष्ठा सुपेकर व आभास सुपेकर या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमात काळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात त्रिवेणी मोघे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सृष्टी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सृष्टी सेवाभावी संस्था आंबेजोगाई (जि. बीड) अध्यक्षा मीनाक्षी डोंगरे, उपाध्यक्ष माधुरी साळवे, सचिव भारती एकलारे, विकास डोंगरे, वर्षा जाधव, त्रिवेणी मोघे, संजय पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले. आभार अविनाश कदम यांनी मानले.