अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक संघटना व डाव्या पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तर देशात वाढता हिंसाचार व जातीय द्वेष संपविण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन करुन धर्मनिरपेक्ष व एकतेचा संदेश देण्यात आला.
वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाकपचे राज्य सहसचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, आयटकचे अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संजय सावंत उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, सत्य, अहिंसेच्या मार्गाने गांधीजींनी क्रांती घडवली.त्यांच्या विचारांची रुजवणे होणे अपेक्षित आहे. त्यांच्या विचार व कार्याची दखल भारताने नव्हे तर संपुर्ण जगाने घेतली आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज समाजाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी महात्मा गांधीजींच्या बलिदानाचा इतिहास युवकांपर्यंन्त पोहचविण्याची खरी गरज आहे. धर्मांध जातीय शक्ती महात्मा गांधी यांच्या विचारांच्या विरोधात असून, देशात दोन समाजात तेढ निर्माण करुन हिंसा पसरवत आहे. यामुळे जातीयवादी राजकीय पक्षांची राजकीय पोळी भाजली जात असून, अशा प्रवृत्ती विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार बळ देणार असल्याचे सांगितले.तर महात्मा गांधी यांची हत्या करणारा गोडसे व गोडसेवादी विचारांचा त्यांनी निषेध नोंदवला.
जालिंदर बोरुडे यांनी महात्मा गांधीजी यांच्या विचार व कार्याने स्वातंत्र्य भारताची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांची शिकवण आत्मसात केल्यास तन व मनाचे शुध्दीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.