जाचक अटी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजना रद्द करण्याची मागणी
जाचक अटीमुळे दिव्यांग बांधव लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्यंत जाचक अटी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होणार असून,सदर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, बाबासाहेब महापुरे, चाँद शेख, नवनाथ औटी, खलील शेख, मनोहर मराठे, संभाजी गुठे, सुनिल वाळके, जाकीर शेख, सुदाम माताडे, बाहुबली वायकर, निर्मला भालेकर, अरूण गवळी आदी सहभागी झाले होते.
मागील अनेक वर्षामध्ये जिल्हा परिषदने पाच टक्के सेस फंडातून दिव्यांग कल्याणार्थ योजना राबवल्या गेल्या.या योजनेचा दिव्यांग बांधवांना चांगल्या प्रकारे फायदा झालेला असून,विशेषत: मतिमंदांच्या औषोधोपाचारासाठी त्यांच्या पालकांना देण्यात येणारे अनुदानही अत्यंत उपयुक्त ठरले. या योजना दिव्यांग कल्याणार्थ होत्या.
परंतु चालु आर्थिक वर्षामध्ये फक्त दोनच योजना राबवण्याचा चुकीचा ठराव घेऊन मंतिमंद प्रवर्गातील दिव्यांगासह इतर दिव्यांग बांधवावर अन्याय केलेला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजनेद्वारे ग्रामीण भागातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची तरतुद आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अत्यंत जाचक असून, त्यामुळे सदर योजनेचे लाभार्थी मिळणे अवघड होणार आहे.यामुळे इतर दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ मिळणार नसून, दिव्यांग निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अत्यंत जाचक अटी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होणार असल्याने ही योजना रद्द करण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले आहे.
———————
अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी लावण्यात आलेल्या अटी जाचक असून, याचा दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. त्यामुळे मागील योजनाच कार्यान्वीत ठेवाव्या, अन्यथा बेमुदत उपोषण सुरुच राहणार आहे. – चाँद शेख