- Advertisement -
सावेडी उपनगराचा विकास करू : किरण काळे
काँग्रेसकडून नागरिकांशी संवाद कार्यक्रम
प्रतिनिधी : सावेडी उपनगराचा विस्तार झपाट्याने होत आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधा पुरेशा नाहीत. सावेडीसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल, स्मशानभूमी, दररोज नळाला पाणी, दर्जेदार रस्ते, कार्यान्वित असणारे पथदिवे, युवकांच्या हाताला रोजगार महिलांना स्वयंरोजगार असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांना विजयी करा. त्यांच्या माध्यमातून सावेडी उपनगराचा विकास करू, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावेडी उपनगरात नागरिकांशी संवाद कार्यक्रम, भेटीसाठी घेतल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक एक, दोन, चार आणि पाच मध्ये विविध भागात जात काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे ,काँग्रेसचे सावेडी विभाग प्रमुख अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून प्रभाग एक मध्ये आयोजित नागरिकांच्या संवाद कार्यक्रमात काळे बोलत होते.
यावेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, अजय मिसाळ, किशोर कोतकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
काळे म्हणाले, नगर दक्षिणेसाठी सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि अडचणीच्या प्रसंगात हाक दिल्यानंतर तात्काळ उपलब्ध होणारा, विकासाचे व्हिजन असणारा खासदार निवडून देण्याची गरज आहे. लंके यांनी अल्पावधीत पारनेर तालुक्यात केलेले काम सगळ्यांना माहित आहे. त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विजयाचा रथ रोखण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही.
राणीताई लंके म्हणाल्या, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत. समाजाचं सुखदुःख हे आम्ही आपलं मानतो. साधेपणाने जगतो. मात्र समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. नगर शहर तसेच सावेडी उपनगराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहो. यावेळी अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले दशरथ शिंदे यांच्यासह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
- Advertisement -