नेवासा (प्रतिनिधी) – विनापरवाना अल्पवयीन सुसाट तरुणाईला ब्रेक लावण्यासाठी अखेर नेवासा पोलिसांनी बडगा उगारला असून सोमवारी पहिल्याच दिवशी 22 जणांवर कारवाई करून तब्बल 46 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे.
अल्पवयीन सुसाट तरुणाई ही या परिसरातील एक महत्वाची समस्या बनली आहे. सधन पालक सारासार विचार न करता आपल्या अल्पवयीन पाल्यांना शाळा, महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासला जाण्या-येण्यासाठी महागड्या रेसर दुचाकी घेऊन देतात. परंतु जबाबदारीचे कुठलेही भान नसलेली ही नवतरुणाई रस्त्यांवरून भरधाव वेगाने वेडी-वाकडी वाहने चालवून वाहतूक समस्येत मोठी भर घालत असल्याचे वास्तव आहे. अशा प्रकारे भरधाव वेगाने वेडी-वाकडी वाहने चालविल्याने भीषण अपघाताच्या दुर्दैवी घटनांत असंख्य लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.
या सुसाट तरुणाईची मोठी समस्या या परिसराला चांगलीच भेडसावत होतीच. कायद्यातही अशा प्रकारे अल्पवयीन तरुणाई विनापरवाना वाहन चालविण्यास दिल्याबद्दल त्यांच्या पालकांनाच दोषी धरून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची तरतूद काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ या उक्तीप्रमाणे या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले नव्हते.
नेवासा पोलीस ठाण्यात विजय करे रुजू झाल्यानंतर त्यांनी परिसरातील ही समस्या अचूक हेरून अशा प्रकारे विनापरवाना भरधाव वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन सुसाट तरुणाईवर कारवाईचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल 22 जणांवर कारवाई करून 46600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नेवासा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अल्पवयीन तरुणाईचे चांगलेच धाबे दणाणले असून पालकांनीही त्याचा धसका घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. पोलीस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गावंडे तसेच पोलीस हवालदार गणेश गलधर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नेवासा पोलिसांनी सुरू केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे तालुक्यातून स्वागत होत असून या कारवाईची व्याप्ती व तीव्रता वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.