अहमदनगर (प्रतिनिधी)-
जय जवान, जय किसान या लालबहादूर शास्त्रींच्या घोषवाक्याची आठवण ठेवून प्रत्येक राज्य कर्त्यांनी आजी-माजी सैनिकांसह शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेची परिस्थिती दिवसंदिवस खालवली जात आहे. प्रस्थापित घराणेशाही व भ्रष्टाचारामुळे देशाचा विकास खुंटला आहे. राजकारणातील घराणेशाही, गुंड व भ्रष्ट प्रवृत्ती संपविण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबध्द असल्याची भावना पार्टीच्या महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सुनीताताई झिंजुर्डे यांनी व्यक्त केली.
अहमदनगर शहराच्या दौर्यावर आलेल्या झिंजुर्डे यांनी सैनिक समाज पार्टी शहर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे यांनी झिंजुर्डे यांचे स्वागत करुन त्यांच्या हस्ते पक्षाचे ध्वज कार्यालयावर फडकविण्यात आले. यावेळी अरुण खिची, सुभेदार भाऊसाहेब आंधळे, अॅड. अनिता दिघे, शिवाजी वेताळ, अॅड. स्वाती गायकवाड, अॅड. संदीप डमाळे, अबोली वेताळ, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
औरंगाबाद येथील असलेल्या झिंजुर्डे यांनी सदर ठिकाणी सुरु असलेल्या माजी सैनिकांच्या विविध संघटना व कार्याची माहिती दिली. महाराष्ट्र कार्यकारिणी अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाज भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे कार्य सुरु आहे. सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल परमार यांचे ध्येय व उद्दिष्टाने या पार्टीची वाटचाल सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, शेतकरी व सर्व समाजातील जागृक देशभक्त नागरिकांना या पार्टीमध्ये जोडण्याचे काम प्रामुख्याने केले जात असून, २०२४ मध्ये या पार्टीच्या माध्यमातून विधानसभा व लोकसभेच्या सर्व जागा लढविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य निर्माण करण्याच्या भावनेने संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी वेताळ व सौ. वेताळ यांनी मिरी (ता. पाथर्डी) येथे गो शाळा सुरू केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.