स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते – राणीताई लंके
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने राणीताई लंके यांचा सत्कार
सावेडीत पार पडल्या महिलांच्या विविध स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी) – स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते. महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. महिला जे काम हातात घेतात, ते सिद्धीस घेऊन जातात. चिकाटी वृत्तीने महिला कुटुंबाच्या प्रगतीत हातभार लावत असतात. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचे उपक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी केले.
गुलमोहर रोड, येथील कमलाबाई नवले सभागृहात प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिला सदस्यांचा कार्यक्रम पार पडला . यावेळी लंके बोलत होत्या . ग्रुपच्या वतीने सौ. लंके यांचा ओटी भरुन महिलांनी सत्कार केला. यावेळी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, विद्या बडवे, प्रयासच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग, उपाध्यक्ष कविता दरंदले, सचिव शकुंतला जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी, विद्या बडवे, खजिनदार मेघना मुनोत, संचालिका रजनी भंडारी, छाया राजपूत, अनिता काळे, प्रतिभा भिसे, वंदना गोसावी, सुरेखा बारस्कर, सुजाता पुजारी, सोनी पूरनाळे, अर्चना बोरुडे, लता कांबळे, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे आदी उपस्थित होत्या.
विद्या बडवे म्हणाल्या की, यशस्वी पुरुषामागे एक महिला उभी असते. राजकीय वारसा नसताना निलेश लंके यांनी माणुसकीने केलेल्या कामातून यश मिळवले. ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंत उत्तुंग झेप घेतली. हा एक थक्क करणारा प्रवास त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे सक्षमपणे उभ्या असल्याने शक्य झाले आहे कोरोना काळात लंके यांनी केलेले कार्य राज्यासाठी आदर्श ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहुण्यांचे स्वागत अलकाताई मुंदडा यांनी केले. महिलांसाठी मेघना मुनोत व अपेक्षा संकलेचा यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेतल्या. यामधील विजेत्यांना देखील बक्षीस देण्यात आली. शोभा झंवर यांनी स्वरचित कविता सादर केल्या. आभार रजनी भंडारी यांनी मानले.