स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेरचा विकास थांबला पारनेर मध्ये डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर डागली तोफ
माजी आमदाराच्या धोरणहीन राजकारणामुळे पारनेर तालुका विकासापासुन वंचित : खा. डॉ. सुजय विखे
पारनेर (प्रतिनिधी)
स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. असा घणाघात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या मतदारांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. रविवारी त्यांनी पारनेर मधील कान्हुर पठार भागात बुथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते विश्वनाथ कोरडे, माजी जि.प. सदस्य काशिनाथ दाते, तालुका अध्यक्ष राहूल शिंदे, दिनेश बाबर, गोकुळ काकडे, सागर व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यातील बहुतांश भागात पठारी शेती केली जाते.या भागात शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत असताना स्थानिक माजी आमदारांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या परिसारात ढोकेश्वर पांडव लेणी, पळशीचे विठ्ठल मंदिर, लवण स्तंभ, कोरठण खंडोबा मंदिर, भालचंद्र गणेश मंदिर, सिध्देश्वर मंदिर अशी विविध स्थळे आहेत, त्यातून पर्यटन विकास साधता आला असता. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला असता, पण स्थानिक माजी आमदारांनी या दृष्टीने कधीही विचार केला नाही. कारण त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही.पर्यटन विकासासाठी आमदाराने दमडीचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे संधी असतानाही पारनेर तालुका पर्यटन विकासापासून वंचित राहिला. पण आता असे होणार नाही.येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यनातून पर्यटनाचा विकास केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.
या परिसरात मेंढपाळ बांधवांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी माजी आमदार नेहमीच उदासीन राहीले आहेत. या बांधवांसाठी लोकर प्रक्रिया केंद्रासाठी निर्णय झाला आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. हा प्रकल्प पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठी संजिवनी ठरणार असून मेंढपाळ बांधवांचा विकास साधला जाणार असे त्यांनी सांगितले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. त्यात पारनेरकरांचा वाटा असणार आहे. यामुळे विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.