गौरी गणपती सजावट स्पर्धा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम;उप-वनसंरक्षक सुवर्णा माने यांचे प्रतिपादन.
अहमदनगर प्रतिनिधी – गौरी गणपती सजावट स्पर्धा हा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम आहे.महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबवावे, असे आवाहन उप-वनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले.
स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवात आयोजित गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना उप-वनसंरक्षक माने यांच्या हस्ते पैठणी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या स्पर्धेचे आयोजन स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे व भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी यांचे संकल्पनेतून करण्यात आले होते.
गौरी सजावट स्पर्धेच्या प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी सृष्टी हिकरे या ठरल्या. सिद्धी पेंडुरकर यांनी व्दितीय, तर सुरेखा धोकटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत २७ सहभागी आरासींचे परीक्षण करण्यात आले.
यावेळी मधूर भंडारी, वृक्षप्रेमी सचिन पेंडूरकर, विशाल जगताप, संकेत शेलार आदी उपस्थित होते. शोभा चंद्रकांत भंडारी, रुपेश भंडारी यांचे सौजन्याने पैठणी साड्या देण्यात आल्या.
चांगले अन् दर्जेदार उपक्रम राबवू
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी स्नेहबंध फाउंडेशनने हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या माध्यमातून चांगले आणि दर्जेदार उपक्रम भविष्यकाळातही आयोजित करण्यात येतील,असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सांगितले.