स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दरोडा घालणारे ३ अट्टल गुन्हेगार कर्जत पोलिसांकडून जेरबंद..

0
96

सोन्याची चैन, मोबाईलसह एक लाखाच्या रोख रखमेवर डल्ला

 

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

स्वस्तात सोने घेण्याचा मोह जेजुरीतील तिघांना चांगलाच महागात पडला आहे. स्वस्तात सोने देतो म्हणुन एका दरोडेखोराने सात पुरुष व दोन महिलांच्या मदतीने खेडनजीकच्या आखोणी परिसरात बोलावून जेजुरीच्या दिघांना जबर मारहाण करत सोन्याची चैन, एक मोबाईल व एक लाखाची रक्कम असा एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल बळजबरीने लुटल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. विशेष म्हणजे कर्जत पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करून तिघांना अटक करत गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.

शेखर वसंत माने (रा.जेजुरी,रेल्वे स्टेशन ता.पुरंदर जि.पुणे) असे फिर्यादीचे नाव असुन फिर्यादी हे तीन वर्षांपुर्वी खुनाच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असताना तिथे भाऊ बेल्या काळे याच्याशी ओळख झाली होती.तुरुंगात दोघेही वर्षभर एकत्र राहिले होते. त्यानंतर फिर्यादी हे तुरुंगातुन सुटून घरी आले होते.

तीन आठवड्यापुर्वी भाऊ काळे याने फिर्यादीला फोन करून तुरुंगातील ओळख सांगून ‘माझ्याकडे सोने आहे,तुला स्वस्तात सोने देतो’ असे म्हणाला. त्यावर वेळ भेटल्यावर येतो असे फिर्यादीने सांगुनही तो पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीस वारंवार फोन करत होता.त्यावर ५ पाच ते सहा दिवसांपुर्वी फिर्यादी (टाकळी ता.करमाळा) येथे आले असता भाऊ बेल्या काळे व त्यासोबत अन्य दोन महिलांनी दोन चैनमधील गंठन दाखवले ते सोने असल्याची फिर्यादीने खात्री केली.त्यावर ‘दोन लाख घेऊन या,तुम्हाला सोने देतो’ असे संभाषण झाल्यावर फिर्यादी तेथून गावी निघून आले.

दि.२५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भाऊ बेल्या काळे याने फोन करून ‘तुम्ही येणार आहे का? असे विचारले.त्यावर फिर्यादीने सांगतो असे म्हणत एक लाख रुपयांची जमवाजमव केली.त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे मित्र ओंकार जाधव, रामभाऊ झगडे असे तिघे फिर्यादीच्या मारुती अल्टो गाडीतून (एम.एच.०५ ए.एस ७७३४) सकाळी ११ वाजता निघाले.त्यावेळी फिर्यादीने आपल्या मित्रांना स्वस्तातील सोने घेण्यासाठी चाललो असल्याची माहिती दिली होती.त्यादरम्यान भाऊ काळे याने कोठे आले?आणखी किती वेळ लागेल?अशी वेळोवेळी विचारणा केली.

त्यानंतर फिर्यादी बारामती-भिगवण-खेड नजीकचा भीमा नदी पुल ओलांडून खेड व आखोणी शिवारात खराब डांबरी रस्त्याच्या ठिकाणी दुपारी २ च्या सुमारास आले. त्या ठिकाणी भाऊ बेल्या काळे उभा होता व त्याच्याबरोबर पायजमा-शर्ट घातलेला आणखी एकजण होता.त्यानंतर त्यांनी गाडीपासून बाजूला येण्यास सांगितले असता सर्वजण बाजुला गेले.

त्यावेळी भाऊ बेल्या काळे याचे सहा जोडीदार व दोन महिला तीन मोटारसायकलवरून आले. त्यांनी फिर्यादी व मित्रांवर दगड मारायला सुरुवात करून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.त्यातील एकाने बळजबरीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली.फिर्यादीचा मित्र रामभाऊ झगडे याच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढला.काहींनी गाडीची उचकापाचक केली व त्यातील एक लाखाची रक्कम काढून घेऊन मोटारसायकलवर निघून गेले.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्जत पोलिसांनी आरोपी नामे अभिमान दागिन्या काळे, राहणार इंदिरानगर, राशीन, तालुका कर्जत, अविनाश उर्फ लल्या बेळया काळे, राहणार जवळा, तालुका जामखेड आणि आणखी एक असे तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींची ही नावे निष्पन्न केली आहेत.

या गुन्ह्यातील आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पुणे जिल्ह्यातील लोनिकाळभोर, लोणीकंद, रांजणगाव या पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, घरफोडी, दरोड्याची तयारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

स्वस्तात सोने, दागिन्यांच्या आमिषाला कुणीही बळी पडू नका!

‘स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी येतात. अगोदर थोडे सोने दाखवून संबंधितांना विश्वासात घेऊन मग त्यांची निर्जन ठिकाणी बोलावून जबर मारहाण करून रोख रक्कम, दागिने, मोबाईल बळजबरीने चोरी करून घेऊन जातात. मात्र कुणीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कमी कष्टात,कमी रकमेच्या मोबदल्यात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू नका.

      – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत

ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,पोलीस उप निरीक्षक भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे, पोलीस जवान भाऊसाहेब काळे, अंकुश ढवळे, शाम जाधव, अर्जुन पोकळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनील खैरे, मारुती काळे आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here