जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
राज्यात अनेक भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन,उडीद,कांदा कापूस पिकांचे नुकसान झाले आहे ते पाहण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला वेळ नाही. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी वेगवेगळे छापे व धाडीचे नाटक चालू आहे.यातुन किती संपत्ती मिळाली हे कधीच कळत नाही.राज्यकर्ते हे शेतकरी लाचार रहावा गरीब रहावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात.शेतकरी सक्षम झाला तर त्यांची दुकानदारी बंद होईल असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने जामखेड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.यासाठी मा.खासदार राजू शेट्टी,माजी मंत्री रविकांत तुपकर,जामखेड तालुकाध्यक्ष मंगेश आजबे,दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, जिल्हसंघटक अॅड.ऋषीकेश डुचे,संघटना प्रमुख हनुमान उगले,जनार्धन भोंडवे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, शहर उपाध्यक्ष नितीन जगताप,माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे यांच्या सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.राजू शेट्टी,रविकांत तुपकर व मंगेश (दादा) आजबे हे बैलगाडीत बसून मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,आपल्या बापाचे दुख कमी करण्यासाठी तरूण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत आणी याच बळावर मी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांच्या तावडीतून सोडविणार आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले की,राज्यकर्ते हे पांढर्या कपड्यातील दरोडेखोर आहेत.या दरोडेखोरांना धडा शिकवण्यासाठी राजू शेट्टीना साथ देणे आवश्यक आहे.आपल्या सहकार्याने शेट्टी हे या रक्त पिपासू दरोडेखोरांचा बिमोड करणार आहेत.
राज्यकर्त्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर आपला दबाव कायम ठेवण्यासाठी जामखेड परिसरातील शेतकरी बांधवांनी मंगेश आजबे यांना साथ द्यावी असे आवाहन तुपकर यांनी केले.
या मेळाव्यात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या
१) आमचे अधिकार – अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे होऊन त्वरीत मदत मिळावी
२) ऊसाच्या बिलाची रक्कम तुकडे न पाडता एक रक्कमी एफआरपीच्या नियमानुसार मिळावी
३) सोयाबीन व उडीद पिकासाठी कायमस्वरूपी हमीभाव मिळावा
४) राज्य सरकारने घोषित केलेले ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरीत मिळाले अशा विविध मागण्यां करण्यात आल्या.