हजारो भाविकांच्या उपस्थितीत केडगावला कीर्तन महोत्सवाचा समारोप
समाधान शर्मा यांचे काल्याचे कीर्तन
परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -समाधान महाराज शर्मा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सव रंगला होता. किर्तन महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते.
शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी काल्याचे कीर्तन केले. शर्मा महाराज म्हणाले की, परमार्थाशिवाय जगात काहीच नाही. पूर्वीच्या काळात माणसे वाईट वागत नव्हती, त्यामुळे त्याना चांगलं वागा शिकवायची गरज भासत नव्हती. या कलयुगात कीर्तन, प्रबोधन, विचारवंतांच्या प्रबोधनानंतरही समाजात अपेक्षित असलेला बदल होताना दिसत नाही. समाजात कार्य करणारे अमोल येवले सारखे हिरे चांगल्या विचाराने बदल घडवू शकतात. त्यांच्या मागे मोठ्या संख्येने असलेली युवा शक्ती परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप सातपुते म्हणाले की, जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन समाजात संस्कार रुजविण्याबरोबर सामाजिक दिशा देण्याचे काम करत आहे. दरवर्षी केडगावकरांना कीर्तन महोत्सवाची पर्वणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
केडगाव येथे सुरु असलेल्या पाच दिवसीय किर्तन महोत्सवासाठी भाविकांनी पहिल्याच दिवसापासून समारोप पर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. माजी नगरसेवक अमोल येवले यांनी केडगावकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.
या समारोपीय किर्तन महोत्सवासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौदर, बाळासाहेब बोराटे, किरण काळे,मा नगर सेवक विजय पठारे, मा नगरसेवक संग्राम कोतकर,विठ्ठल कोतकर, अजित कातोरे, ह.भ.प. क्षीरसागर महाराज, ह.भ.प. भाकरे महाराज, ह.भ.प. बोरकर महाराज, गारुडकर सर, ओंकार सातपुते आदींसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
- Advertisement -