भाजप सरकार नथुराम गोडसे व जनरल डायर प्रवृत्ती पोसत असल्याचा आरोप
केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या प्रतिकात्मक दगड पाण्यात विसर्जित
हुतात्मा झालेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली
अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकर्यांना मोटारीखाली चिरडल्याच्या घटनेचा निषेध नोंदवून, भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. हुतात्मा स्मारकात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर घोषित करुन मंत्रीच्या प्रतिकात्मक दगडाचे पाण्यात विसर्जन करण्यात आले.

प्रारंभी हुतात्मा झालेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली वाहून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. संबळच्या निनादात मंत्री मिश्रा यांच्या प्रतिकात्मक दगडास पाण्यात बुडविण्यात आले. स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात भाजप सरकार नथुराम गोडसे व जनरल डायर प्रवृत्ती पोसत असल्याचा आरोप करीत भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
लखीमपूरमध्ये शेतकर्यांना गाडीने चिरडण्याची व गोळीबाराची घटना घडली. जालियनवाला बागप्रमाणे परिस्थिती उद्भवली. यामध्ये आठ आंदोलक शेतकरी हुतात्मा झाले. या घटनेचा मुख्य आरोपी आशिष मिश्रा हा भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आहे. मंत्रीपुत्राने हा हिंसाचार करुन जालियनवाला बागची पुनरावृत्ती केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अर्शद शेख म्हणाले की, लखीमपूरला झालेला हिंसाचार पुर्वनियोजित होता. मंत्री मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलन चिरडण्याची भाषा केली होती. याच भावनेने प्रेरित होऊन त्यांच्या पुत्राने शेतकर्यांना गाडीखाली चिरडले.हा मंत्री म्हणजे देशी जनरल डायर ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.अॅड.कारभारी गवळी म्हणाले की,भाजपने हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या मंत्रीचा राजीनामा घेतला नसला, तरी देखील सर्व जनतेच्या वतीने त्याला पाण्यात विसर्जित करण्यात आले आहे. भाजप नथुराम गोडसे प्रवृत्ती जोपासत आहे.
तीन कृषी कायदे रद्द होण्यासाठी शेतकर्यांनी चालवलेले आंदोलन भाजप सरकार दडपण्याच्या तयारीत असल्याचे, ते म्हणाले.अशोक सब्बन यांनी केंद्र सरकार शेतकर्यांच्या आंदोलनावर मार्ग न काढता आंदोलन चिरडण्यासाठी कोणत्याही थरावर जाण्याची तयारी दाखवत आहे.यामुळे कृषिप्रधान देशात मंत्रीच्या गाडीखाली शेतकरी चिरडला जात आहे.जालियनवाला बागची ही पुनरावृत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.