अहमदनगर प्रतिनिधी – १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ सानुग्रह अनुदान व लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार व अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
या प्रश्ना संदर्भात शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने उपोषणाचा इशारा दिला होता.याची दखल घेऊन शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शालेय शिक्षण व ग्रामविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.
यामध्ये राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा,या बाबतीत एकत्रित बैठक झालेली होती.
त्या अनुषंगाने निर्णय घेण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही सुरू असल्याने संघटनेच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले.मात्र या गंभीर महत्त्वपूर्ण विषय संदर्भात शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गेल्या तीन वर्षात शासन निर्णयानुसार दहा वर्षे सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती दहा लाख सानुग्रह अनुदान प्राप्त झालेला नाही.
यामुळे मृत झालेल्या शिक्षकांचे कुटुंबीय उघड्यावर येत असून,या गंभीर विषयाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षक कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना तात्काळ सानुग्रह अनुदान १० लाख रुपये व इतर लाभ देण्याची मागणी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.