5 सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे
तर कोविड रजेबाबत कार्यवाही करण्याची शिक्षक परिषदेची मागणी
शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण व कोविड रजेबाबत शिक्षक परिषद आग्रही – बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईसह राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण प्राधान्याने ५ सप्टेंबरपर्यंत करावे व कोविड रजेबाबत कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षण विभागाला पाठवले आहे. शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण व कोविड रजेबाबत शिक्षक परिषद आग्रही असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने राज्यातील सर्व शिक्षकांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत दि.२५ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे राज्य सरकारच्या आरोग्य विभागास कळविले आहे. त्यानुसार अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या संदर्भात कळवलेले आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे. याकरिता शाळा जवळच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात व्यवस्था करावी, तसेच शक्यतो निवासस्थानाजवळ विधानसभा क्षेत्र ज्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू असतील तेथे प्राधान्यक्रम देऊन शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण करावे, गैरसोय टाळण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतरांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच कोविड रजेबाबत महाराष्ट्र राज्य आरोग्य संचालनालयाने या अगोदरच महानगरपालिकांना पत्र दिले आहेत. त्यानुसार कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्यास किंवा विलगीकरणात रहावे लागण्याच्या कालावधीची शिक्षक व शिक्षकेतरांना रजा मिळावी याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अगोदरच वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. तसेच कोरोना ड्युटी करणार्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्टीत बदली रजा मिळावी याबाबत कोणतेही आदेश देण्यात आले नसून, यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केलेली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.
या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.