शहरात जागतिक मल्लखांब दिवस साजरा
महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटर मध्ये मल्लखांबचे पूजन
संपूर्ण जगाने या खेळाला स्वीकारले – उमेश झोटिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटर मध्ये जागतिक मल्लखांब दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मानव विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र रासने व रसिक ग्रुपचे संकेत होशिंग यांच्या हस्ते मल्लखांबचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रीय मलखांब प्रशिक्षक व संस्थेचे प्रमुख उमेश झोटिंग म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षापासून बालिकाश्रम रोड येथील महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून मल्लखांबाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य सुरु आहे.
मल्लखांब हा अतिशय कमी वेळात संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा असा व्यायाम प्रकार असून, या खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. मराठी संस्कृतीतला खेळ असलेला मल्लखांबसाठी युवक-युवती पुढे येत असल्याचा अभिमान वाटत आहे. आपल्या देशामध्ये या खेळाचा उगम झालेला असून, आता संपूर्ण जगाने या खेळाला स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
या संस्थेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षक प्रणिता तरोटे, आप्पा लाढाणे, ऋतुजा वाल्लेकर, अक्षता गुंड पाटील, गौरी गौड हे प्रशिक्षक उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. या कार्यास मोहनशेठ मानधना यांचे सतत सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. याप्रसंगी सर्व मल्लखांब खेळाडू प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.