पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने
विजयादशमीला महापालिकेचे ढब्बू मकात्या महापालिका नामांतर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय रस्ते, ठिकठिकाणी साचलेले घाण पाण्याचे डबके, शहरातील अस्वच्छता, पसरलेले साथीच्या आजाराने शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना, विजयादशमीच्या दिवशी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करण्यात आले.
नालेगाव येथील अमरधामच्या प्रवेशद्वारा समोर नामांतराचे फलक लावून महापालिकेच्या कारभारा विरोधात आक्रोश करण्यात आला. तर ढब्बू मकात्याशाही संपविण्याचा निर्धार करुन नागरिकांनी सिमोल्लंघन केले.
महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, रईस शेख, बबलू खोसला, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, ज्ञानदेव चांदणे, पोपट भोसले, सुनिल टाक, पोपट साठे, राक्षी प्रजापती आदी नागरिक सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत. शहरामध्ये वेड्या बाभळीची शेती व खड्डयांनी खुळखुळे झालेले रस्ते आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहून गेले असून, झालेल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. निकृष्ट रस्त्यांना जबाबदार ढब्बू मकात्या प्रवृत्ती आहे.
ढब्बू म्हणजे कालबाह्य झालेले नाणे व मकात्या प्रवृत्ती म्हणजे मला काय त्याचे? होईल ते होऊ द्या. ही प्रवृत्ती स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुध्दा पोसली गेली. यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळून रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. टक्केवारीमुळे रस्त्यांचा दर्जा चांगला राहिला नसून, सर्वच रस्ते खुळखुळे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, रस्त्यासाठी कोट्यावधीची केलेली कामे खड्डयात गेली. मतदान खरेदी, जातीपातीचा वापर करून मागच्या दाराने मोठ्या संख्येने महापालिकेत ढब्बू मकाते सत्तेत आले. शहरात रस्त्यांची चाळण झाली असताना लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेच्या अधिकार्यांचा त्याचे काहीएक दुःख नाही.
याला कारणीभूत टक्केवारी, अनागोंदी, टोलवाटोलवी, भ्रष्टाचार आणि डब्बू मकात्याशाही असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन यांनी शहराचा विकास म्हणजे फक्त रस्ते, वीज, पाणी नव्हे. रोजगार, आरोग्य इतर मुलभूत प्रश्न देखील आहेत. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षात मुलभूत नागरी प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिधी असमर्थ ठरले आहे.
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्शद शेख यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. तर महापालिकेचे आयुक्त नागरिकांना नागरी सुविधा देण्यास अपयशी ठरले असून, त्यांच्या राजीनाम्याची नागरिकांच्या वतीने मागणी केली.