कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
तृतीयपंथी व्यक्तींसाठी घरकुल व स्मशानभूमी चे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था अधिकाऱ्यांनी करावी त्यांना सामाजिक न्याय विभाग तात्काळ मंजुरी देईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे बोलताना जाहीर केले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत नगर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना समाज कल्याण विभाग अहमदनगर यांच्यावतीने ओळखपत्र वाटप व जनजागृती अभियान कार्यक्रम कर्जत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त भगवान विर व अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे, बांधकाम विभागाचे संजय पवार, अमित निमकर, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी सलोनी काजल गुरु नायक, मस्तानी अक्षय जाधव, मीरा संध्या शेख, गणेश संजय खुडे उर्फ गौरी, मुनाफ मोहिब, शिवन्या शामा भालेराव, रेणुका उर्फ अमीर अहमद, शाहरुख सलीम शेख उर्फ जोया, नवनीता रमेश जगधने, कृष्णा सुरेश देवकर, साधना शीला शेख यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी सोलोली काजल गुरू यांच्या वतीने राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना तृतीयपथीय कल्याणकारी संस्था अहमदनगर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी विविध योजना शासनामार्फत राबविल्या जात असतात, प्रत्येक समाजाला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी आहे.परंतु तृतीयपंथीयांच्या साठी अहमदनगर जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची योजना राबवली जात नाही व या समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
हा समाज वंचित व दुर्लक्षित असून यामुळे जीवन जगण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाज वास्तव करत आहे,मात्र या कालावधीमध्ये त्यांच्या मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे.समाजात राहत असताना देखील आम्हाला कोणीही भाड्याने घर घेत नाही. रोजगार मिळत नाही.कोणी कामावर ठेवत नाही, सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे मृत्यू झाल्यानंतर पूर्तीविधी करण्यास परंपरा आहे.मात्र हा विधी करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही.अनेक वेळा हा विधी करण्यापासून आम्हाला रोखण्यात येते.
यामुळे समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल व पूर्तीविधि करीता स्मशानभूमी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काजल गुरू यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी केली.
या निवेदनानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी तृतीयपंथी व्यक्तींसाठी राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार व आमचा सामाजिक न्याय विभाग हा सातत्याने विविध योजना राबवत आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणाहून घरकुल व स्मशानभूमीसाठी प्रस्ताव येतील ते तातडीने अधिकाऱ्यांनी तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवून द्यावी त्यांना तात्काळ मंजुरी दिली जाईल असे यावेळी जाहीर केले व संपूर्ण समाज आणि सरकार आपल्या पाठीशी आहे.असे यावेळी श्री मुंडे बोलताना म्हणाले.
तृतीयपंथी कल्याणकारी संस्था यांच्या वतीने धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकार्यांचे आभार काजल गुरू यांनी मानले.