Pune Breaking : पुण्यात किडनीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश मिळाल आहे.
या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत एकूण १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूरच्या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती.
ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले.
त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत गेल्या. ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं.त्यानंतर पोलीसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला.
दरम्यान आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.तसेच या प्रकरणी अधीक्षक डॉ.अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले होते.आता याप्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.