पेन्शनर कर्मचार्यांना दिवाळीपुर्वी महागाई फरक मिळण्याचा मार्ग मोकळा
महापालिका पेन्शनर असोसिएशनच्या बैठकित आयुक्तांचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका पेन्शनर कर्मचार्यांना महागाई फरक देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले असून, मंगळवारी (दि.12 ऑक्टोबर) महापालिका पेन्शनर असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळासह झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष एन.एम. पवळे यांनी दिली. दिवाळीपुर्वी महापालिका पेन्शनरांना महागाई फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दिवाळीपुर्वी महापालिका पेन्शनर कर्मचार्यांना महागाई फरक व सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित बिले मिळण्यासंदर्भात आयुक्त शंकर गोरे व मुख्य लेखा अधिकारी मानकर यांच्यासह पेन्शनर असोसिएशनच्या पदाधिकारींच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये पेन्शनर कर्मचार्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सन 2017 ते 2018 मध्ये महागाई भत्त्याचा प्रलंबित असलेला 56 लाख रुपयांचा फरक देण्याची मागणी करण्यात आली.
आयुक्त व अर्थ विभागाचे मुख्य लेखाधिकारी यांच्याशी चर्चा होऊन दिपाळीपुर्वी 56 लाख रुपये महागाई भत्ता फरक देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित देयके अदा करण्याकरिता बिले तयार झालेली नाही. ती तात्काळ तयार करण्याचे आश्वासन या बैठकित पेन्शनरांच्या शिष्टमंडळास देण्यात आले.
सदरची रक्कम सुमारे चार कोटी पर्यंत असून त्याची थकबाकी किती आहे? हे बिले तयार झाल्यानंतर समजणार आहे. बैठकित सकारात्मक निर्णय घेऊन आयुक्तांनी पेन्शनरांनी मांडलेल्या सर्व प्रश्न सोडविण्याबाबत सुचना केल्या आहेत.
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष एन.एम. पवळे, डि.यू. देशमुख, एल.के. जगताप, वसंत थोरात, इम्तियाज शेख, मंजूर शेख, रंगनाथ गावडे, मोहन खपके, एन.एस. वाघ, बी.एच. भोर, मधुकर खताळ, रमेश खोलम, बोरगे, ज्ञानेश्वर धिरडे, टेपाळे, इक्बाल शेख, मंजूर अहमद शेख आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
डी.यू. देशमुख यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाचे स्वागत करून आयुक्त व मुख्य लेखा अधिकारी यांचे आभार मानले.