अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर महानगरपालिका आणि मा.जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महालोक अदालतमध्ये शहरातील मालमत्ताधारकांनी एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कर भरला आहे.
यामध्ये आज १ कोटी ७५ लाख रुपयाची माफी नागरिकांनी घेतली.याबद्दल महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे, आयुक्त श्री.शंकर गोरे,उपमहापौर श्री.गणेश भोसले,स्थायी समिती सभापती श्री अविनाश घुले, सभागृह नेते श्री.अशोक बडे,महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.पुष्पाताई बोरुडे,उपसभापती सौ.मीनाताई चोपडा,अतिरिक्त आयुक्त डॉ. श्री.प्रदीप पठारे,उपायुक्त (कर ) श्री.यशवंत डांगे सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले.
सदर महालोक अदालत मध्ये मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती या साठी २० हजार पेक्षा जास्त मालमत्ता कर असलेल्या १६००० मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या.
कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना सहकार्याच्या भूमिकेतुन महानगरपालिकेने शास्तीवर ७५% आणि चालू बिलावर ८% सूट देण्यात आली होती.फक्त एक दिवस शास्ती माफी दिली असल्याने १०५० प्रकरणात एकाच दिवसात ३ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला.
सदर सूट बाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे आवाहन करण्यात आले होते. रोख भरणा,चेक द्वारे,ऑनलाईन आणि मोबाईल ऍप द्वारे भरणा करण्यासाठी पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते.
दिनांक २५/०९/२०२१ रोजी मा.जिल्हा न्यायालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महालोक अदालत मध्ये महापालिका कर संकलन विभागातील कर्मचारी यांनी परिपूर्ण तयारी केली होती.
यासाठी आयुक्त श्री.शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त पठारे सो उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी वैयक्तीक लक्ष दिले व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे मालमत्ताधारकांचे आभार मानले.
यावेळी सहा. मूल्य निर्धारक श्री.सुनील चाफे,सर्व प्रभाग अधिकारी,कर निरीक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.