कारसाठी 2 लाख रुपये माहेरकडून आनण्यासाठी सुरु होता छळ
अहमदनगर(प्रतिनिधी) – पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. या छळास कंटाळून विवाहित महिला तेजश्री धिरज रांधवणे (वय २२ वर्षे) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत मुलीचे वडिल आदिनाथ बाळदेव केळकर (रा. कासर पिंपळगाव, ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पती धीरज बाबासाहेब रांधवणे, सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे, सासू सुनिता बाबासाहेब रांधवणे आणि दीर सुरज बाबासाहेब रांधवणे (सर्व रा.तिसगाव,ता.पाथर्डी) यांच्या विरोधात हुंडाबळी प्रतिबंध कायद्यान्वये पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ मार्च ते २३ एप्रिल २०२२ दरम्यान विवाहित महिलेला पती व सासरच्या मंडळींकडून त्रास देणे सुरु होते.१३ ऑगस्ट २०२० रोजी तेजश्री केळकर यांचा विवाह धीरज रांधवणे यांच्याशी झाला. सुरवातीला मुलीला सासरच्या लोकांनी चांगले नांदवले. नंतर मार्च २०२२ मध्ये पतीला कार घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आनण्याची मागणी तेजश्रीकडे केली जाऊ लागली. पैसे न दिल्याने त्याचा पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. स्वयंपाक येत नाही, मुलाला सांभाळता येत नसल्याचे कारण देऊन तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जाऊ लागला. या त्रासाला कंटाळून व छळ सहन न झाल्याने मुलगी तेजश्री रांधवणे हिने शनिवारी २३ एप्रिलला राहत्या घरी गळफास घेतला.
तिला उपचारासाठी अहमदनगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले.मात्र ती मरण पावली असल्याचे फिर्यादीत तिच्या वडिलांनी म्हंटले आहे.२५ एप्रिलला महिलेच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन अंत्यविधीसाठी बॉडी माहेरच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आली.