स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी कुष्ठधाम येथे अवतरले गाडगेबाबा

0
98

अहमदनगर (प्रतिनिधी)- गोपाला.. गोपाला.. देवकीनंदन गोपाला… गीत गात गात कुष्ठधाम परिसरात हातात झाडू घेऊन चक्क संत गाडगेबाबा अवतरले. नागरिक देखील त्यांना पाहण्यासाठी जमले होते. गाडगेबाबांनी उपस्थितांना सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले. तर कुष्ठधाममध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य व परीस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान व मतदार जागृती कार्यक्रमात ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करुन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मतदार दूत डॉ. अमोल बागुल, सागर आलचेट्टी, शरद वाघमारे, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, दीपक वाकचौरे, अनिता वाकचौरे, मंगल सोनवणे, कमल काळे, जयेश कवडे, रंजना वाकचौरे, आकाश काळे, परीस फाऊंडेशनचे अध्यक्ष निकिता वाकचौरे, सचिव वर्षा काळे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. तोडकर म्हणाले की, आंतरिक व बाह्य स्वच्छता निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. आपल्या मनातील विचारानुसार कार्य करण्याची ऊर्जा मिळते. म्हणून आंतरिक विचार स्वच्छ व प्रामाणिक असावेत. आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, आपला घर, परिसर, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवल्यास निरोगी व सुदृढ जीवन जगता येणार असल्याचे सांगितले. परीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाकचौरे यांनी स्वच्छता मोहीम ही एक दिवसा पुरती मर्यादित न ठेवता, वर्षभर राबवण्याची गरज आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. स्वच्छता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, त्यासाठी स्वच्छता आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. अमोल बागुल यांनी मतदान प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सुदृढ लोकशाहीसाठी निर्भयपणे व अमिषाला बळी न पडता शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. तरच योग्य लोकप्रतिनिधी नेतृत्व करतील. मतदार नोंदणी, दुरुस्ती, मतदान कार्ड, मतदार यादी याबाबत जागरूक राहण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल सोनवणे यांनी केले. आभार वर्षा काळे यांनी मानले. यावेळी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, लोककलावंत उपस्थित होते. अभियानासाठी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here